Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांकडून शेत जमिनी संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यात अनेकांचे शेजारी शेतकरी शेताचा बांध कोरत असल्याच्या तक्रारी असतात. तसेच शेजारी शेतकरी बांध कोरत असेल तर काय केले पाहिजे असा देखील प्रश्न काही लोकांकडून उपस्थित केला जातो.
जर तुमचाही असाच प्रश्न असेल, तुमचाही बांध तुमचे शेजारील शेतकरी कोरत असतील किंवा भावकीतील शेतकरी बांध कोरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. आज आपण शेजारी शेतकऱ्याने जमिनीचा बांध कोरला तर काय केले जाऊ शकते, यासाठी कायद्यामध्ये काय-काय तरतुदी आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर, वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडे जमिनीचे क्षेत्र खूपच कमी झाले आहे. जमिनीचे सातत्याने विभाजन होत असल्याने सध्या अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. असे शेतकरी आधीच जमीन कमी असल्याने संकटात आहेत. त्यातच अशा अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक असलेल्या काही शेतकऱ्यांचे बांध कोरले जातात, ज्यामुळे जमिनीचे क्षेत्र अजून कमी होते.
बांध कोरला जातो म्हणून बांधावरून पायी चालताना देखील त्रास होतो. अशा स्थितीत बांध कोंरणाऱ्या शेतकऱ्यांवर कायद्यानुसार काय ॲक्शन घेतली जाऊ शकते याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचा जमिनीचा बांध कोरला जाणार नाही.
जर तुमच्या शेजारी असलेले शेतकरी किंवा भावकी तुमच्या जमिनीचा बांध कोरत असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 7 (1) नुसार व कलम 26 नुसार दावा दाखल करू शकता. दावा दाखल केल्यानंतर दिवाणी न्यायालय अशा प्रकरणावर सुनावणी घेते. सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून सदर प्रकरणावर निर्णय दिला जातो.
जर खरंच सदर शेजारील शेतकऱ्यांकडून जमिनीचा बांध कोरला जात असेल तर न्यायालयाच्या माध्यमातून सदर शेजारील शेतकऱ्यावर कायमस्वरूपी मनाई आदेश बजावला जाऊ शकतो. याशिवाय न्यायालयाकडून जमिनीची मोजणी देखील मागितली जाऊ शकते. जेणेकरून तुमची जमीन खरंच कोरली गेली आहे का? याची तुम्हाला माहिती मिळू शकेल.