Cotton Farming : कापूस हे मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे लागवडीच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर येते. मात्र उत्पादनात महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा पहिला क्रमांक लागतो. याचाच अर्थ आपल्या महाराष्ट्रात कापसाची एकरी उत्पादकता खूपच घसरलेली आहे. शेतकऱ्यांच्या मते कापूस पिकातून त्यांना एकरी आठ ते 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. काही शेतकऱ्यांना तर एवढे उत्पादन देखील मिळवता येत नाही.
कापूस उत्पादन घटन्याचे अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे कापूस लागवड करताना शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे.
शेतकऱ्यांनी कापसाची लागवड आता मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून करावी असे आवाहन केले जात आहे. छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड तालुक्यातील जवळपास 17 गावातील शेतकऱ्यांनी 760 हेक्टर शेतजमिनीवर कपाशी लागवड करताना ठिबक सिंचनासह मल्चिंगवर लागवडीचे तंत्र स्वीकारले आहे.
विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी याआधी देखील हा प्रयोग केला आहे. शेतकऱ्यांच्या मते या तंत्रज्ञानाने जर कपाशी लागवड केली तर पिकावर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. शिवाय यामुळे उत्पादनात देखील वाढ होते. सुरुवातीच्या टप्प्यात एक ते दोन गावांमध्ये हा प्रयोग राबवला गेला होता.
मात्र आता जवळपास 17 गावांमध्ये या तंत्रज्ञानाने कापूस लागवड करण्यात आली आहे. मल्चिंग तंत्रज्ञानाच्या स्वीकारापूर्वी कपाशीचे ८ ते १४ क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळत होते. तसेच पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या कापूस लागवडीत कीड व रोग फवारणी खर्च ८००० ते ११००० प्रति एकर येत होता.
पण मल्चिंगसह ठिबक तंत्रज्ञानाच्या स्वीकारामुळे कपाशीचे एकरी उत्पादन १८ ते २२ क्विंटलपर्यंत पोहचले आहे. तसेच या आधुनिक तंत्रज्ञानाने कपाशी लागवड केल्यास कीड व रोग फवारणीचा पाच हजारापर्यंतचा वाचत आहे. अर्थातच उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनात भरीव वाढ होत आहे.
या तंत्रज्ञानाने कपाशीची लागवड केल्यास अंतर मशागतीचा खर्च झिरो होतो. तन नियंत्रण करताना देखील अधिक खर्च करावा लागत नाही. निश्चितच कापूस लागवडीचे हे सुधारित तंत्र कापूस उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.