Cotton Rate 2023 : दोन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाला होता. गेल्या हंगामाचा विचार केला असता गेल्या हंगामात पांढरे सोनं सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच गेल्या विजयादशमीच्या काळात दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला होता. मात्र हा मुहूर्ताचा कालावधी होता. यानंतर बाजारभावात सातत्याने घसरण झाली आहे. सध्या बाजारात या चालू हंगामातील नवीन कापूस दाखल झाला आहे.
परंतु बाजारभाव अजूनही दबावातच आहेत. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या बाजारात जो कापूस येत आहे तो संपूर्ण माल बागायती भागातील आहे. कोरडवाहू भागातील माल अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे कोरडवाहू भागातील कापसाचे बोंडे अजूनही भरलेली नाहीत. येत्या काही दिवसात मात्र कोरडवाहू भागातील कापूस देखील वेचणीसाठी तयार होणार आहे. परंतु यंदा कापसाचे उत्पादन विक्रमी कमी होणार आहे.
कमी पावसामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन घटणार आहे. एकीकडे उत्पादनात घट होत आहे तर दुसरीकडे बाजारात मालाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या बाजारात कापूस 7200 ते 7300 अशा बाजारभावात विक्री होत आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा कमी दर आहे. दरम्यान कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची सरकारी खरेदी केव्हा सुरू होणार हा सवाल उपस्थित केला आहे. अशातच दिवाळीनंतर कापसाची सरकारी खरेदी सुरू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
सीसीआयच्या माध्यमातून दिवाळीनंतर कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर दसऱ्याच्या महूर्तावर सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू केली जाते. परंतु यंदा कापूस खरेदीला उशीर होणार आहे. दिवाळीच्या नंतर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू होईल असे सांगितले जात आहे. यामुळे आता सीसीआयची कापूस खरेदी केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच यावर्षी कापसाला काय भाव मिळू शकतो हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कापूस दहा हजाराचा टप्पा गाठणार का ?
यावर्षी कापसाचे उत्पादन घटणार आहे. कमी पावसामुळे यावर्षी कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. पण यंदाचा कापूस हा दर्जेदार राहणार आहे. यावर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव खूपच कमी प्रमाणात झाला असल्याने कापसाचा दर्जा चांगला राहणार असा अंदाज आहे. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही परिस्थितीमधील कापूस यंदा दर्जेदार राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र यावर्षी कापसाला सात ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचाच दर मिळेल अशी शक्यता आहे. याचे कारण म्हणजे उत्पादनात घट आलेली असली तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारात अजून भारतीय कापसाला म्हणावा तसा उठाव मिळत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मागणी नसल्याने सध्या देशांतर्गत बाजार भाव दबावात आहेत.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे जर येत्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आणि कापसाचे प्रतिखंडी दर 60,000 पर्यंत गेलेत तर कदाचित भाव वाढ होऊ शकते. परंतु जर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला उठाव मिळाला नाही तर बाजारभाव सध्या जो दर मिळत आहे त्याच पातळीवर फिरत राहतील. एकंदरीत, यंदा कापूस 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता थोडीशी कमीच आहे. पण भाववाढीची शक्यता नाकारता येणार नाही.