Cotton Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की दिवाळी पूर्वी हमीभावाच्या आसपास विक्री होणारा कापूस आता हमीभावापेक्षा अधिक दरात विकला जात आहे.
विशेष बाब म्हणजे राज्यातील काही बाजारात कापूस आठ हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून दोन वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे कापसाला दहा ते बारा हजाराचा भाव मिळाला होता तसाच भाव याही वर्षी मिळणार का ? हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
खरंतर कापूस बाजार भाव गेल्या हंगामापासून दबावात आहेत. म्हणून पांढर सोनं म्हणून ओळखल जाणार हे पीक शेतकऱ्यांसाठी खूपच आतबट्ट्याचे ठरू लागले आहे.
कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली असल्याने आणि मालाला चांगला भाव मिळत नसल्याने या पिकासाठी आलेला खर्च देखील गेल्या काही वर्षांपासून भरून काढता येत नाहीये.
हेच कारण आहे की, अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी इतर पर्यायी पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड झाली आहे.
यंदा पावसाळ्यात कमी पाऊस झाला असल्याने कापसाचे उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात होता.
विशेष म्हणजे दिवाळीपर्यंत अशीच परिस्थिती कायम होती. यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळणार की नाही हा मोठा सवाल होता. पण आता दिवाळीनंतर कापूस बाजारभावात सुधारणा होऊ लागली आहे.
काल अर्थातच 21 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील बहुतांशी बाजारात कापसाचे कमाल दर साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
मात्र बाजारभावात झालेली ही सुधारणा आगामी काळातही अशीच कायम राहणार का याबाबत तज्ञ लोकांनी आत्ताच काहीही सांगणे घाईचे असल्याचे नमूद केले आहे. यामुळे भविष्यात काय भाव मिळतो याचा अंदाज बांधणे थोडे कठीण आहे.
‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार 700 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास भाव मिळाला होता. अशातच काल झालेल्या लिलावात म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात राज्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला किमान 7000, कमाल 7445 आणि सरासरी 7200 एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.