Cotton Seeds : यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे यंदा मान्सूनचे अंदमानात दोन दिवस आधीच आगमन होणार आहे. यामुळे केरळात देखील यावर्षी 29 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर दहा जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. एकंदरीत मान्सून आगमनाची तारीख जवळ येत आहे. यामुळे आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग देखील वाढणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाणार आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उद्यापासून अर्थातच 16 मे 2024 पासून यावर्षी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तथापि शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात एक जून नंतरच पेरणी केली पाहिजे असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कापसाची लवकर पेरणी झाली तर गुलाबी बोंड अळीचा धोका वाढत असतो यामुळे कापसाची वेळेवर पेरणी करणे आवश्यक असते.
तसेच यावर्षी वाण निवडताना दीर्घ कालावधीचे वाण निवडणे टाळावे असे देखील आवाहन तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार यावर्षी अर्थातच खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति बॅग 864 रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो.
हा भाव सर्वसाधारण आहे. कंपनीच्या दर्जानुसार किमतीत थोडाफार बदल पाहायला मिळू शकतो. दरम्यान कृषी विभागाने ठरवून दिलेल्या तारखेला अर्थातच उद्यापासून शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे उपलब्ध होईल अशी माहिती समोर आली आहे.