Havaman Andaj 2023 : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे जाहीर केले होते. 25 सप्टेंबरला पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली होती.
यानंतर हळूहळू संपूर्ण उत्तर भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनही मान्सूनने माघारं घेतली आहे. राज्यातील जवळपास 45 टक्के भागातून मान्सून परतला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातूनही लवकरच मान्सून माघारी फिरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
मुंबई आणि कोकणातून लवकरच मान्सून माघारी फिरणार
आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत मध्य महाराष्ट्रातुन मान्सून माघारी फिरला आहे. तसेच मुंबई आणि कोकणातूनही येत्या दोन दिवसात मान्सून माघारी फिरणार आहे. नऊ ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातून मानसून माघारी फिरणार आहे.
मात्र, जाता-जाता मान्सून राजधानी मुंबईचा अभिषेक करणार असल्याचे चित्र तयार होत आहे. आगामी काही तासात मुंबई आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस गायब होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.
एकंदरीत आगामी काही दिवस मुंबईसह कोकणातील काही भागात परतीचा पाऊस बरसेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष बाब अशी की गेल्या 24 तासात दक्षिण कोकण गोवा आणि मुंबई मधील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
शिवाय आगामी काही तास या भागात पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आता हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. काही ठिकाणी निश्चितच ढगांची चादर पाहायला मिळू शकते मात्र पावसाची शक्यता नगण्य आहे.