Havaman Andaj : सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत आहेत. काही भागातील हार्वेस्टिंग पूर्ण देखील झाली आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून शेतकरी बांधव आता शेतीमालाची विक्री देखील करू लागले आहेत. बाजारात नवीन शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कापसाला आणि सोयाबीनला मात्र बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. मात्र नवीन हंगामातील लाल कांदा चांगलाच भाव खात आहे.
कांद्याला या हंगामातील सर्वोच्च भाव मिळत आहे. काल सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा तब्बल ८० रुपये प्रति किलो अर्थातच 8000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी भावात विकला गेला आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण आहे. अशा या परिस्थितीत कांद्याचे बाजार भाव वाढले आहेत म्हणून याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा मिळणार आहे. सध्या कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दरम्यान सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. पावसाळी काळात अपेक्षित असा पाऊस बरसलेला नसल्याने. शिवाय परतीचा पाऊस देखील महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेला नसल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांसाठी पावसाची गरज आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात चेंज पाहायला मिळत आहे.
आता सकाळच्या तापमानात घट होत आहे. यामुळे वातावरणात मोठा गारवा पाहायला मिळत आहे. शिवाय, आगामी काही दिवसात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. परंतु सोमवारी वातावरणात एक चेंज येणार असून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. राज्यातील जवळपास चार जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पाऊस पडणार असा अंदाज बांधला आहे.
कोणत्या भागात पडणार पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अर्थातच 29 ऑक्टोबर रोजी कोकणात पावसाची शक्यता आहे. सोमवारी दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल आणि या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
विशेष म्हणजे सोमवारी सिंधुदुर्ग मध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याचे देखील शक्यता आहे. याशिवाय, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे. यासोबतच पुढील आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देखील सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मंगळवारसाठीही येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच दक्षिण कोकणातील रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीने दिला आहे.