Havaman Andaj : गेली कित्येक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपली कृपादृष्टी दाखवली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी लागली आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र काल गुरुवारीच पाऊस झाला आहे. याआधी जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके भाग वगळता कुठेच पाऊस झालेला नव्हता.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पण या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना केवळ तात्पुरता दिलासा मिळणार आहे. जर खरीप हंगामातील पिकांना या संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना दमदार पावसाची गरज आहे. यामुळे सर्वत्र मोठ्या पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. खरतर या सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील अनेक भागात या चालू महिन्यातही पाऊस झालेला नाही. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार करत आहे. याच्याच प्रभावामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. दरम्यान आता पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात आता पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज अनेक हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, आज आणि उद्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडणार आहे.
खुळे यांनी 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मुसळधार पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे जर आज आणि उद्या महाराष्ट्रात चांगला मुसळधार पाऊस झाला तर निश्चितच खरिपातील पिकांना नवीन जीवदान मिळेल यात शंकाच नाही.