Havaman Andaj November 2023 : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे मात्र गुलाबी थंडी गायब झाली आहे. राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
तर राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. यामुळे नेमका हिवाळा सुरु आहे की पावसाळा हा सवाल आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामानाबाबत पुन्हा एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी पोषक हवामान असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज हवामान खात्याने राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विशेष सावध राहण्याची गरज आहे.
खरे तर यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात राज्यात फारसा पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे.
शिवाय महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आता पाण्याचे संकट पाहायला मिळत आहे. पाण्याची भीषण टंचाई होऊ लागली आहे. येत्या काही दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकर सुरू करावे लागणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. आज देखील राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
कुठे गारपीट होणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या हवामान अंदाजानुसार आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि नासिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच आज पालघर, बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असा अंदाज असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशीव, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आज या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एकंदरीत आज राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे अपेक्षित आहे.