कांद्याच्या किमतीत दुप्पट वाढ ! मोदी सरकारचा पुन्हा मोठा निर्णय, कांदा पुन्हा होणार कवडीमोल ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajarbhav : गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य परेशान आहेत. वाढलेले इंधनाचे दर, खाद्यतेलाचे वाढते भाव यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढत आहे. नुकत्याच एका महिन्याभरापूर्वी टोमॅटोचे बाजार भाव विक्रमी वाढले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले होते. यामुळे शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली.

अशातच आता कांद्याचे बाजार भाव किरकोळ बाजारात आणि घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांदा किरकोळ बाजारात तब्बल 80 रुपये ते शंभर रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. जर किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने काही निर्णय घेतले नाहीत तर आगामी काळात हे बाजारभाव 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कांदा पुन्हा एकदा वांदा करणार हे स्पष्ट होत आहे. फक्त एका आठवड्याच्या काळातच कांद्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. यामुळे स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात कांदा 30 ते 35 रुपये प्रति किलो या भावात विकला जात होता. मात्र आता हे बाजार भाव दुपटीने वाढले आहेत आता किरकोळ बाजारात कांदा सरासरी 80 रुपये प्रति किलो या भावात विकला जात आहे.

येत्या काही दिवसात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी कांदा हा शंभरी पार झाला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवात देशांतर्गत कांद्याची मागणी कमी झाली होती. यामुळे त्यावेळी कांद्याचे बाजारभाव पोषक परिस्थिती असतानाही अपेक्षित वाढले नाहीत. पण नवरात्र उत्सवानंतर कांद्याची देशांतर्गत मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे कांद्याची निर्यात देखील वाढली आहे.

तसेच यंदा मान्सून काळात महाराष्ट्रासहित प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. कमकुवत पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधील खरीप कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. खरीप कांदा पिकाचं नुकसान झाले आहे. शिवाय यामुळे खरीप हंगामातील कांदा उशिराने काढण्यासाठी तयार होणार आहे. तसेच उन्हाळी कांद्याचा साठा देखील संपत चालला आहे.

यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून दर पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे गेल्या कित्येक महिन्यानंतर राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशातच मात्र किरकोळ बाजारातील कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने आता केंद्र सरकार बफरच स्टॉक मधील कांदा किरकोळ बाजारात विकणार आहे. पंचवीस रुपये प्रति किलो या बाजारभावात हा कांदा विकला जाणार आहे. सरकार देशातील एकूण 16 शहरांमध्ये बफर स्टॉक मधील कांदा विक्री करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. लाईव्ह मिंट या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात येतील अशी शक्यता आहे. साहजिकच यामुळे घाऊक बाजारात देखील कांद्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळणार आहे. याशिवाय कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने आणखी एक निर्णय घेतलेला आहे. सरकारनं 28 ऑक्टोबर रोजी कांद्यासाठी किमान निर्यात शुल्क (MEP) 800 डॉलर एवढे निश्चित केलं आहे.

याआधी हे किमान निर्यात शुल्क 400 डॉलर प्रति टन एवढे होते. म्हणजेच यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या लादलेल्या शुल्कामुळे कांद्याच्या सर्वोच्च किंमती 5 ते 9 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील या निर्णयाच्या प्रभावामुळे कांद्याच्या घाऊक भावात 4.5 टक्क्यांनी घट आली आहे. तसेच या निर्णयामुळे आगामी काळात बाजार भाव आणखी कमी होतील अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.

Leave a Comment