Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हळूहळू सुधारत आहेत. खरंतर, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कांद्याला खूप चांगला भाव मिळत होता. कांद्याचे बाजार भाव अनेक ठिकाणी 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.
सरासरी बाजार भाव देखील दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र अचानक केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक निर्णय घेतला. केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.
यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. यामुळे देशांतर्गत कांद्याचा साठा वाढू लागला आहे आणि याचा परिणाम म्हणून बाजारभावात घसरण होत आहे. साहजिकच याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसत आहे. दरम्यान गेल्या एका आठवड्यापासून पुन्हा एकदा कांदा दरात सुधारणा होऊ लागली आहे.
आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. तर सोलापूर एपीएमसी मध्ये लाल कांद्याला देखील 3200 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. याशिवाय चंद्रपूर गजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4200 रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर या चालू वर्षात बाजारात खूपच लहरीपणा पाहायला मिळाला. सुरुवातीला बाजारात चांगली तेजी होती. फेब्रुवारी नंतर बाजारात कमालीची मंदी आली. फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या काळात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपयाचा भाव मिळाला होता.
यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. हेच कारण होते की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. दरम्यान शासनाने देखील फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
यानुसार सध्या कांदा अनुदानाचा पैसा वितरित करण्याचे काम सुरू आहे. याचा पहिला टप्पा नुकत्याच काही दिवसांपूर्वी वितरित झाला असून दुसरा टप्पा देखील लवकरच वितरित केला जाणार अशी माहिती समोर आली आहे. अशातच आता पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव हळूहळू वाढू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.