Loksabha Election : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार देशात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि 4 जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपले अधिकृत उमेदवार देखील जाहीर केले जात आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीने राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. बाकी राहिलेल्या जागांवर देखील लवकरच उमेदवार उतरवले जाणार आहेत.
दरम्यान काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज देखील भरले जात आहेत. तसेच निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मतदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरे तर निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदारांना मत देण्यासाठी आमिष दाखवतात.उमेदवारांनी जर मतदारांना मतदानासाठी काही लाच दिली तर त्यांच्यावर कारवाई होते.
मात्र अनेकांच्या माध्यमातून जर मतदाराने मतदानासाठी उमेदवाराकडून पैसे, दारू, मटण अशा स्वरूपात लाच घेतली असेल तर अशा मतदारांवर काय कारवाई होते ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेणार आहोत.
मतदानासाठी लाच घेतली तर मतदारावर काय कारवाई होते?
जर एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदार जर दारू, मटण किंवा पैशांची लाच घेताना सापडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. मतदान करण्यासाठी जर एखादा मतदार लाच घेताना सापडला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो म्हणजे FIR रजिस्टर केली जाऊ शकते.
भारतीय दंड संहितेच्या कलम 171 A नुसार, जर एखादा मतदार पैसे, दारू, मटण अशी लाच घेताना सापडला तर त्याला एक वर्षाची कारावास किंवा दंड होऊ शकतो. अथवा एक वर्षाची कारावास आणि दंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
म्हणजेच मतदानासाठी लाच देणे जसा गुन्हा आहे तसाच लाच घेणे हा देखील गुन्हा आहे. एवढेच नाही तर मतदानासाठी लाच घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच लाच कुठं मिळतं आहे हे जाणून घेणे देखील गुन्हा समजला जातो.