निवडणुकीदरम्यान प्रवास करताना 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळली तर खरंच कारवाई होणार का ? नियम काय सांगतो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loksabha Election : सध्या संपूर्ण देशात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आपल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज देखील भरले जात आहेत. तसेच लवकरच तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदानाला 19 एप्रिल पासून सुरुवात होणार असून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल 4 जून 2024 ला लागणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाली असल्याने काही गोष्टींवर निर्बंध लागू झाले आहेत.

या काळात फक्त नेत्यांनाच निर्बंध असतात असे नाही तर सर्वसामान्य नागरिकांवर देखील आचारसंहिता कालावधीमध्ये निर्बंध लावले जातात. आचारसंहिता कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक प्रवासादरम्यान किती रोख रक्कम, दागिने किंवा दारू घेऊन प्रवास करू शकतात याचे देखील नियम तयार झालेले आहेत.

दरम्यान, आता आपण आचारसंहिता कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक किती रोख रक्कम घेऊन जाऊ शकतात ? याबाबतचे नियम काय आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

किती रक्कम सोबत बाळगू शकता 

भारतात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम किंवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू सोबत बाळगल्यास सर्वसामान्यांना त्याची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.

रोख रक्कम असेल तर बँकेचे स्टेटमेंट आणि भेटवस्तू असेल तर त्या वस्तूचे बिल तुम्हाला दाखवावे लागू शकते. जर बिल किंवा बँकेचे स्टेटमेंट तुम्ही दाखवले नाही तर तुमच्याकडील रोख रक्कम किंवा भेटवस्तू जप्त केली जाऊ शकते.

यामुळे जर तुम्ही व्यवसाय किंवा इतर अन्य काम करत असाल तर त्या रक्कमेची अधिकृत नोंद तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कारण की, अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर तुम्हाला ती रक्कम कुठून आली याचा पुरावा द्यावा लागणार आहे.

तथापि, जर तुमची रक्कम किंवा भेटवस्तू जमा झाली असेल तर तपासादरम्यान तुम्ही अधिकाऱ्यांना योग्य तो पुरावा देऊन, कागदपत्रे दाखवून ती रक्कम किंवा भेटवस्तू परत मिळवू शकता. आचारसहिता कालावधीत दारूच्या वाहतूकीवर सुद्धा निर्बंध लावलेले असतात.

या काळात १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची औषधे, भेटवस्तू आणि दारु बाळगणे बेकायदेशीर मानले जाते. तथापि, जर तुमच्याकडे सदर भेटवस्तूचे योग्य कागदपत्रे असतील तर अधिकारी तुमची भेटवस्तू किंवा पैसे जमा करणार नाहीत.

Leave a Comment