Maharashtra Agriculture News : यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा बघायला मिळाला आहे. सुरुवातीला जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जुलैमध्ये राज्यात बऱ्यापैकी पाऊस झाला मात्र तरीही राज्यातील काही भागात त्यावेळी देखील समाधानकारक असा पाऊस पडला नाही. यानंतर ऑगस्ट महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल अशी आशा होती.
पण ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिन्यात जवळपास 20 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पाहायला मिळाला. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात आली. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस पडला.
7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी लागली. मात्र या चालू सप्टेंबर महिन्यात देखील राज्यातील काही भागात पाऊस झालेला नाही. विशेषता मराठवाड्यात आजही पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील फारसा पाऊस झालेला नाही. यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे एवढे नक्की.
अशातच शेतकऱ्यांना आता शासनाकडून मदतीची आशा आहे. शासन महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून राज्यातील बळीराजाला दिलासा देईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाबाबत चर्चा रंगल्या आहेत. अशातच राज्याचे नवोदित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होणार की नाही याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर होणार की नाही याबाबत कृषिमंत्री मुंडे यांनी मोठी अपडेट दिली आहे. मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्या भागात 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.
तसेच दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचारले असता मुंडे यांनी पुढे पर्जन्यमान कसे राहील यावर दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. तसेच सध्या दुष्काळ जाहीर करता येणार नाही असे देखील मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. पण मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करण्याची गरज पडल्यास दुष्काळ जाहीर केला जाईल असे मोठे आश्वासन यावेळी दिले आहे.
तसेच ज्या भागात 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना सध्या मदत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. एकंदरीत महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याबाबतची शिंदे-फडणवीस-पवार सरकारची भूमिका नवोदित कृषी मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केली आहे.