Maharashtra Government Employee News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरतर राज्यात येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर पासून राज्यात गणेशोत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान राज्यातील काही कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच एक मोठे गिफ्ट मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिंदे सरकारने गणेशोत्सवापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र आता त्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच स्वीकृत केला असून या प्रस्तावाला शुक्रवारी अर्थातच काल आठ सप्टेंबर 2023 रोजी मान्यता दिली आहे. यानुसार आता एसटी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयावर एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने टीका केली आहे. संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांना आठ टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली पाहिजे होती मात्र सरकारने फक्त चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली असल्याने नाराजीं व्यक्त केली आहे. तसेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता मिळायला पाहिजे होता मात्र शासनाने तो आता जाहीर केला असून महागाई भत्ता वाढवून मुख्यमंत्र्यांनी काही विशेष काम केले नाहीये अशी टीका एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने केली आहे.
खरंतर एसटी महामंडळात 90 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या निर्णयाचा या 90 हजार कर्मचाऱ्यांना आता फायदा होणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्यापूर्वीच शिंदे सरकारने हा निर्णय घेतला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या निर्णयामुळे आता शासनाच्या तिजोरीवर 9 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच महामंडळातील असूधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 203 टक्क्यांवरून 212 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.