Maharashtra Havaman Andaj August : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतरही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे देशातील ज्या भागात पावसाचा जोर ओसरला आहे तेथील शेतकरी आता चिंतेत सापडले आहेत.
वास्तविक गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के अधिक पाऊस पडला आहे. विशेष बाब अशी की एक जून ते 21 जुलै दरम्यान राज्यात 13 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
म्हणजेच जून महिन्यातील तूट जुलै महिन्याच्या पावसात बऱ्यापैकी भरून निघाले आहे. परंतु गेल्या महिन्यात पाऊस हा सर्वत्र सारखा पडलेला नाही. काही भागात जोरदार पडला तर काही भागात खूपच कमी पडला आहे. यामुळे ज्या भागात जोरदार झाला तेथील पिके जास्तीच्या पावसाने खराब होण्याचा धोका आहे तर ज्या भागात कमी बरसला आहे त्या भागात आता पिके करपण्याचा धोका आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाचा एक महत्त्वाचा हवामान अंदाज समोर येत आहे. IMD ने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आठ ऑगस्ट नंतर देशातील 80 टक्के भागातून पावसाचा जोर कमी होणार आहे. म्हणजेच 8 ऑगस्ट नंतर पावसाचा खंड पडणार असल्याचा अंदाज आहे.
मात्र राज्यातील काही भागात 10 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. आयएमडी ने सांगितले की राज्यातील कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अर्थातच कोकणातही पावसाचा जोर जुलै महिन्याप्रमाणे राहणार नाही, पण या विभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर कमी झाला असून तेथे आता पावसाचा मोठा खंड पडू शकतो. कारण की, हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणारा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही महिन्यात सरासरीच्या 98 टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोकण भागात मात्र पावसाचा जोर कायम असून, तेथे 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे दोन दिवस अतिवृष्टी होणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील आगामी काही दिवस पाऊस पडणार आहे.
या भागात 8 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असा एक अंदाज आहे. त्यानंतर मात्र फक्त पूर्वोत्तर भारतात पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. आठ ऑगस्ट नंतर उर्वरित संपूर्ण देशात पावसाचा जोर मात्र कमी राहणार असे यावेळी IMD ने स्पष्ट केले आहे.
आज राज्यातील हवामान कसे राहणार ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज तारीख सहा ऑगस्ट रोजी राज्यातील कोकण विभागात पावसाची शक्यता आहे. कोकणातील उत्तर कोकणात आज पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विभागाने सांगितल्याप्रमाणे उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.