Maharashtra Havaman Andaj : मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रकोप पाहायला मिळाला होता. ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण-परेशान झाले होते.
पण आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट आली आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. मात्र अजूनही राज्यात थंडीची तीव्रता वाढलेली नाही. सकाळी-सकाळी थंडी पडतेय पण दुपारी उन्हाचे चटके देखील बसत आहेत.
परंतु येत्या काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी झाल्यानंतर राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. पण भारतीय हवामान खात्याने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या आपल्या एका हवामान अंदाजात यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील कमाल आणि किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहणार असल्याचे सांगितले आहे.
याचाच अर्थ नोव्हेंबर महिन्यात यावर्षी दरवर्षी जशी थंडी राहते तशी थंडी राहणार नाही असा अंदाज आहे. अशातच आता राज्यातील हवामानात एक ड्रामेस्टिक चेंज पाहायला मिळत आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात आता अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. हवामान खात्याने राज्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आगामी दोन-तीन दिवस महाराष्ट्रात वादळी पाऊस हजेरी लावणार असे IMD कडून सांगितले जात आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, यावर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस पडलेला आहे. यंदा मानसून काळात सरासरीच्या तुलनेत 88% एवढ्या पावसाची हजेरी लागली आहे. म्हणजे यंदा राज्यात 12% कमी पाऊस बरसला आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळवण्यासाठी पावसाची गरज भासू लागली आहे.
म्हणून शेती पिकांसाठी नेहमीच घातक ठरणाऱ्या अवकाळी पावसाची आता राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायी ठरणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात कमी पाऊस बरसला असल्याने राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील एरणीवर येऊ शकतो. विशेषता महाराष्ट्र राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने हा पाऊस राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो असे मत व्यक्त होत आहे.
कोणत्या भागात बरसणार पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 6 जिल्ह्यांमध्ये आगामी दोन ते तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने म्हटलंय की, दक्षिण भारतात हवेची चक्राकार स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पूर्वेकडील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. म्हणून राज्यातील हवामानात आद्रता वाढण्याची शक्यता आहे.
हेच कारण आहे की, राज्यात आगामी दोन ते तीन दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की, मुंबई, पुण्यातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सऱ्या बरसतील असा अंदाज आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.