Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की हिवसाळा हा सवाल उपस्थित होत आहे. खरंतर यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या एका आकडेवारीनुसार राज्यात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. म्हणजे यंदा फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध भागांमध्ये यंदा कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन समवेतच सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
एवढेच नाही तर काही ठिकाणी पावसाची परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, आत्तापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अशातच मात्र आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाज आहे.
हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने निश्चितच ज्या भागात मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे आणि आगामी काही दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे तेथील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार असा अंदाज आहे.
मात्र या मुसळधार पावसाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे देखील मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने गारपीट मुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात ढगाळ हवामान झाले असून, आय एम डी ने अर्थातच भारतीय हवामान खात्याने आज 25 नोव्हेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रमधील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी झाला आहे.
तसेच उद्या 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. उद्या नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधीत जिल्ह्यांसाठी उद्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.