Maharashtra Havaman Andaj : राज्यात जवळपास 15 ते 16 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वरूणराजाने कमबॅक केले आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तेजी आली असून शेतशिवारातील धावपळ पुन्हा वाढत आहे.
पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी तीव्र सऱ्या पडत आहेत मात्र अजूनही बहुतांशी भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
जोरदार पाऊस कमीच आहे. खरीप हंगामातील पिकांना आता रिमझिम पावसाची नाही तर जोरदार पावसाची गरज आहे. विहिरींना अनेक भागात अद्याप पाणी उतरलेले नाही. यामुळे जोरदार पाऊस झाला तर विहिरींना पाणी उतरेल आणि पुढील हंगामासाठी पाण्याची सोय होईल असे सांगितले जात आहे.
पण पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय झाला असल्याने आता पावसाचा जोर वाढेल आणि खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी देखील राज्यात आता हळूहळू पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
डॉक्टर होसाळीकर यांनी ट्विटरवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील विदर्भ भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
आज मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस कायम राहण्याचा त्यांचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मराठवडयासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आज पावसाची शक्यता लक्षात घेता विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणातही आज पावसाची शक्यता आहे. एकंदरीत आज हवामान विभागाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पाऊस सक्रिय होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेती पिकांना नवसंजीवनी मिळणार असा दावा केला जात आहे.