Maharashtra Havaman Andaj : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मनसोक्त बरसलेला मान्सून देशातील काही राज्यांमधून माघारी परतू लागला आहे. आपल्या महाराष्ट्रातूनही लवकरच मान्सून माघारी परतणार आहे. मान्सूनच्या परतीचा पावसाचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे.
पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातुन चार ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. राज्यातील उत्तर भागातून चार तारखेनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी माहिती पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञ शिल्पा आपटे यांनी दिली आहे.
अशातच आता शेतकऱ्यांकडून तसेच सर्वसामान्य जनतेकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कस राहणार, पाऊस पडणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरंतर गेल्या महिन्यात राज्यात खूप चांगला पाऊस झाला आहे. हवामान खात्याने सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची हजेरी लागल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता.
मात्र तसे काही झाले नाही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आणि यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला नसल्याने अजूनही महाराष्ट्रात संपूर्ण मानसून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचा विचार केला असता संपूर्ण देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कसं राहणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच हवामान?
दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यातील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि गोव्यात पावसाची शक्यता तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून आज अर्थातच एक ऑक्टोबर आणि उद्या अर्थातच गांधी जयंतीला, 2 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण अर्थातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणे अपेक्षित आहे.
दरम्यान ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला की राज्यात कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून यंदा सरासरीपेक्षा अधिकचे तापमान राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.