Maharashtra Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वरूणराजाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो आता लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा वापसी करणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक गेली 122 वर्ष ऑगस्ट महिन्यात पावसाचा एवढा मोठा खंड पडला नव्हता जेवढा मोठा खंड या चालू मान्सून मधील ऑगस्ट महिन्यात पडला आहे.
पावसाने राज्यातील बहुतांशी भागात जवळपास एक महिनाभर दांडी मारली आहे. परिणामी खरीपातील पिके आता मरण यातना सहन करत आहेत. आगामी काही दिवस पाऊस झाला नाही तर पिके जळून खाक होणार आहेत. काही भागात तर ऑलरेडी पिकांनी माना टाकल्या आहेत. या पिकांना आता पाणी आला तरी देखील नवीन जीवन मिळणार नाही.
दरम्यान, खरिपातील ज्या बागायती शेतकऱ्यांची पिके वाचली आहेत त्या पिकांसाठी आणि लेट खरीप हंगामातील तसेच रब्बी हंगामातील उत्पादनासाठी आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. यामुळे बळीराजा अजूनही आभाळाकडे नजर ठेऊन आहे. भारतात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. यापैकी तीन महिन्यांचा काळ हा उलटला आहे.
या तीन महिन्यापैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात तरी जोरदार पाऊस पडला पाहिजे नाहीतर संपूर्ण हंगाम वाया जाईल आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे देखील संकट महाराष्ट्राला त्रास देईल असे मत व्यक्त होऊ लागले आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता, येत्या चार दिवसात मान्सून काही प्रमाणात सक्रीय होणार आहे. याचाच अर्थ येता काही दिवसात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात ३ आणि ४ सप्टेंबरला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत प्रामुख्याने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये समाधकारक पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी यावेळी बांधला आहे.
विशेष बाब म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात काही अपवाद वगळता हवामान विभागाने कोणता अलर्ट जारी केलेला नव्हता. पण सप्टेंबरच्या सुरुवातीलाच काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याने ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे.
याचा अर्थ सप्टेंबरची सुरुवात जोरदार पावसाने होण्याची शक्यता आहे. विदर्भ कोकण मराठवाडा सोबतच पुण्यासह मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.