Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. यामुळे सध्या देशातील बहुतांशी भागात ऑक्टोबर हिट पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यातही मुंबई, पुणे सह मराठवाड्यात ऑक्टोबर हिट मुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातही ऑक्टोबर हिटच्या झळा सर्वसामान्यांना तापदायक ठरत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेली जनता विकेंडला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला निघत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला या ऑक्टोबर हिटपासून लवकरच दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
कारण की, भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर अर्थातच आज आणि उद्या म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 रोजी काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला ऑक्टोबर हिटपासून तूर्तास दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या भागात बरसणार वरूणराजा ?
हवामान विभागाचे तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी राज्यात आज आणि उद्या काही भागात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे. होसाळीकर यांनी याबाबत आपल्या अधिकृत एक्स म्हणजे ट्विटर हँडल वरून माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आज 15 ऑक्टोबर आणि उद्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण विभागातील काही भागात ढगाळ हवामान राहील तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये कोकणासोबतच उत्तर मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज जर खरा ठरला तर संबंधित भागातील सर्वसामान्य जनतेला ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळेल असे चित्र आहे. शिवाय हा पाऊस शेतकरी बांधवांसाठी देखील दिलासा देणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र व्यतिरिक्त हवामान विभागाने दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हिमाचल प्रदेशमधील काही भागात हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशामधेही हलका पाऊस होईल असा अंदाज आहे.