Maharashtra Havaman Andaj : नोव्हेंबर महिना संपण्यास मात्र सहा दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. वास्तविक नोव्हेंबर महिन्यात राज्यात दरवर्षी गुलाबी थंडीची चाहूल लागते. यंदा मात्र राज्यात अजूनही थंडीला सुरुवात झालेली नाहीये. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. सोबतच काही जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील हवामानात बदल होत आहे.
दिवाळीच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने हलका ते मध्यम पाऊस झाला होता. दिवाळीत झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय, या पावसामुळे राज्यातील थंडीची तीव्रता कमी झाली होती.
अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज आता 24 नोव्हेंबर पासून राज्यातील कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आजपासून मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट जारी झाला आहे.
तसेकज नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच रविवारी अर्थातच 26 नोव्हेंबरला राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
रविवारी राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.
तसेच खान्देशमधील नंदूरबार जिल्ह्यात या दिवशी मुसळधार पाऊस बरसणार असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. एकंदरीत आगामी काही दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही भागात गारपीट होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचे तसेच पशुधनाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.