Maharashtra Havaman Andaj : सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील अनेक भागात पाऊस पोहोचलेला नाही.
शिवाय ज्या भागात पडत आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर अपेक्षित असा नाही. यामुळे अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तसेच सामान्य जनतेच्या नजरा आभाळाकडेच आहेत. जनता अद्याप मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरंतर ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे खरीपातील पिके माना टेकत आहेत.
आता या पिकांना जोरदार पावसाची गरज आहे. तसेच अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शिवाय महाराष्ट्रातील प्रमुख धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. यामुळे सर्वत्र मुसळधार पावसाची वाट पाहिली जात आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक मोठी गुड न्यूज दिली आहे.
IMD ने म्हटल्याप्रमाणे, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. विशेष म्हणजे हे कमी दाब असलेले क्षेत्र आता हळूहळू पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे देखील आहेत. याच्या एकंदरीत प्रभावामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार आहे.
या तयार झालेल्या नवीन सिस्टीम मुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असे सांगितले जात आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आणि जोरदार पाऊस पडणार असा नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज पासून विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सात सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.
याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा या विदर्भातील जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. निश्चितच राज्यात आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.