Maharashtra Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. काल हवामान विभागाने आपला सुधारित हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कसा हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
खरंतर जुलै महिन्यात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील अति मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे राज्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते आणि बहुतांशी भागात शेती पिकांमध्ये पाणी साचले होते.
मात्र आता पावसाचा जोर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची आवश्यकता भासत आहे.
दरम्यान काल म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने राज्यात नऊ ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान कस हवामान राहणार? पाऊस पडणार की नाही? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पासून ते 12 ऑगस्ट पर्यंत राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये राज्यात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे. या कालावधीत राज्यात प्रामुख्याने पावसाची उघडीप राहणार असून राज्यातील कोणत्याच जिल्ह्यासाठी आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
यामुळे गेल्या बारा दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत या हवामान अंदाजामुळे आणखी भर पडणार असे चित्र आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जुलै महिन्यात जरूर जास्तीचा पाऊस झाला आहे.
पण उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागात जुलै महिन्यात देखील समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. यामुळे हे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना असे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.
अशातच मुंबई हवामान विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात पुढील सात दिवस हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.