Maharashtra News : राज्य शासन राज्यातील सामान्य जनतेसाठी कायमच कल्याणकारी योजना राबवत असते. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. महिला, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, विद्यार्थी, असंघटित कामगार इत्यादी लोकांसाठी शासनाने अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत.
दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांसाठी शासनाने विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. काल बुधवारी अर्थातच 21 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
हे विमा संरक्षण शासनाच्या खर्चाने राहणार आहे. मात्र हे विमा संरक्षण वारीच्या काळात म्हणजे 30 दिवसांसाठीच राहणार आहे. खरंतर, आषाढी वारीला राज्यातून लाखो वारकरी जातात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक वारीमध्ये सामील होत असतात. यावर्षी देखील वारीसाठी लाखो वारकऱ्यांनी हजेरी लावली आहे.
लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पंढरीच्या रायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी दिलासा देणारा सिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या या विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी असणार योजना?
या योजनेच्या माध्यमातून जर वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान पुरवले जाणार आहे. तसेच जर काही दुर्घटना झाली आणि वारकऱ्याला कायमचे अपंगत्व आले तर अशा वारकऱ्यासं एक लाख रुपये अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे. तसेच अंशतः अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे वारीमध्ये वारकरी आजारी पडल्यास औषध उपचारासाठी 35000 पर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार असून याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.