Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या मौजे धनगड येथील प्रसिद्ध भाकणूक समोर आली आहे. खरंतर पाटण येथील श्री. बिरोबा देवस्थान धनगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखीची मिरवणूक काढली जात असते.
त्यानंतर होईक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी सांगितली जाते. धनगड येथे दरवर्षी बिरोबाच्या यात्रेनिमित्त होईक म्हणजेच भविष्यवाणी किंवा भाकणूक सांगण्याची प्रथा आहे. या भाकणुकीवर परिसरातील नागरिकांचा ठाम विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या प्रसिद्ध होईकाकडे लक्ष लागून असते. हा कार्यक्रम दोन दिवस चालतो आणि येथे हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि परिसरातील नागरिक हजेरी लावतात.
सालाबादाप्रमाणे यंदा देखील धनगड येथे होईक म्हणजे भाकणूक सांगितली गेली आहे. यात पुढील वर्षी जून महिन्यात मुबलक पाऊस होणार असे सांगितले आहे. पुढल्या वर्षी पाऊसमान चांगले राहील, पिके चांगले येतील आणि शेतकरी राजा समाधानी होईल असे या भाकणुकीत सांगितले गेले आहे. यासोबतच यंदाच्या दिवाळीत पाऊस पडणार की नाही याबाबत देखील भाकणुकीत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
खरंतर यावर्षी संपूर्ण मान्सून काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता असते. गुऱ्हाढोरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील आता शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
यामुळे आता अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस मनसोक्त बरसला पाहिजे असे मत व्यक्त होत आहे. शेतकरी बांधव अवकाळी पावसाची देखील अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. अवकाळी पावसामुळे निश्चित शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते मात्र यंदा पावसाळ्यात मनसोक्त पाऊस झालेला नसल्याने अवकाळी पावसाची गरज आहे.
राज्यात दरवर्षी दिवाळीत थोड्याफार प्रमाणात कां होईना पण पाऊस पडत असतो. यामुळे यंदाही दिवाळीत पाऊस पडणार का ? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, धनगड येथील भाकणुकीत या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. धनगड येथील या होईकात यावर्षीच्या दिवाळीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार असे सांगितले गेले आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अस सांगितले जात आहे. दिवाळीत पडणारा हा पाऊस रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यंदा ज्वारी, गहू, हरभराचे पन्नास ते सत्तर टक्के पिक शेतकऱ्यांना येईल. तसेच यंदा कापसाला नऊ ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल, असे देखील या भाकणुकीत म्हटले आहे.