Maharashtra Railway News : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. हेच कारण आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली असून यापैकी पाच मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.
विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे ते सिकंदराबाद आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर लवकरच ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. याव्यतिरिक्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान देखील ही गाडी चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र असे असले तरी वंदे भारत एक्सप्रेस ही महागडी आणि श्रीमंत लोकांची गाडी असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस गाडीच्या तिकीट दरांपेक्षा खूपच अधिक आहेत. अशा परिस्थितीत सध्या ज्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे त्यापैकी बहुतांशी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस कडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.
अशातच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि वंदे भारत एक्सप्रेसला पर्याय म्हणून स्वस्त तिकीट दर असलेली जनसाधारण एक्सप्रेस रेल्वे कडून सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात एकूण 25 जनसाधारण एक्सप्रेस संपूर्ण देशात चालवल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुण्याला देखील जनसाधारण एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आता संपूर्ण देशात गरिबांसाठी 25 जनसाधारण एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यालाही मिळणार जनसाधारण एक्सप्रेस
मीडिया रिपोर्टनुसार स्वस्त तिकीट दर असलेली जनसाधारण एक्सप्रेस पुण्याला देखील मिळणार आहे. ही गाडी पुणे ते अलाहाबाद या मार्गावर सुरू केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निश्चितच या निर्णयामुळे पुण्याहून अलाहाबादकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कशी असेल गाडीची रचना?
जनसाधारण एक्सप्रेस ही देशातील सर्वसामान्यांसाठी सुरू केली जाणार आहे. या गाडीला 24 कोच राहणार आहेत. यापैकी 11 नॉन एसी स्लीपर कोच राहतील तर 11 जनरल कोच राहणार आहेत. या गाडीचे तिकीट दर हे सर्वसामान्यांना परवडतील असा दावा केला जात आहे. दरम्यान पुणे ते अलाहाबाद या मार्गांवर सुरू होणारी जनसाधारण एक्सप्रेस आठवड्यातून एकदा चालवली जाणार आहे.
अर्थातच ही एक साप्ताहिक गाडी राहण्याची शक्यता आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी पुणे विभागाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या या गाडीला जनसाधारण नावाने ओळखले जात आहे मात्र पुढे या गाडीचे नामकरण केले जाईल तेव्हा ही गाडी वेगळ्या नावाने ओळखली जाईल असे सांगितले जात आहे.