Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. गेल्या महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. यामुळे यावर्षी मान्सून चांगला राहील आणि ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस पडेल अशी भोळी-भाबडी आशा शेतकऱ्यांना लागली होती.
मात्र दैवाला काही औरच मंजूर होते. ऑगस्ट महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात जवळपास गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत.
कपाशीचे पीक जवळपास 50 ते 55 दिवसाचे झाले असून या पिकाला आता पावसाची गरज आहे. सोयाबीनच्या पिकाबाबतही अशीच परिस्थिती असून सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत म्हणजेच वाढीच्या अवस्थेत आहे आणि या पिकाला देखील पावसाची फार गरज आहे. या व्यतिरिक्त मका, तूर यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना देखील पाण्याची गरज आहे.
खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा पावसाच्या पाण्याची नितांत आवश्यकता भासत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा वरूणराजाकडे टिकल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन होणार आहे.
हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसण्यासाठी पोषक हवामान तयार झाले असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या दोन दिवसात म्हणजेच 18 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पाऊसाला सुरुवात होणार आहे. राज्यात हवेचा दाब वाढला होता यामुळे काही काळ पावसाने उघडीप दिली होती. मात्र आता हवेचा दाब कमी होत असून याचा परिणाम म्हणून आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
कोकणातील पालघर, रायगड आणि नवी मुंबई या भागात ढगाळ वातावरण राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण विदर्भ आणि कोकणातील उर्वरित भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र पावसाची ये-जा राहणार असा अंदाज आहे. 18 ते 24 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असून या काळात विदर्भ मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.