Maharashtra Rain Alert : गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भ विभागात पावसाची तीव्रता अधिक आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे.
सध्या राज्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पण या जास्तीच्या पावसाने अनेक भागात दरड कोसळण्याच्या तसेच भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आय एम डी मुंबईने संबंधित जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी केला आहे.
IMD ने सांगितलेल्या माहितीनुसार, आज 21 जुलैला राज्यातील उत्तर कोकणातील पालघर आणि ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शिवाय महाराष्ट्रात 25 जुलै पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. 24 जुलै पर्यंत राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 24 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सतर्क राहून शेतकऱ्यांनी शेती कामे करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे असे देखील जाणकार लोकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
IMD ने 25 जुलै पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार आणि मराठवाड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.