Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात जवळपास दहा दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला मात्र या चालू ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
अशातच मात्र हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही भागात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, गुजरात मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने आता आपल्या राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हवामानात झालेल्या या बदलामुळे आणि विकसित झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण विभागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने काल अर्थातच सहा ऑगस्ट रोजी पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. IMD ने सांगितले की, राज्यातील कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे. पण मध्य महाराष्ट्रात घाट माथ्यावरच जास्तीचा पाऊस पडणार असे हवामान विभागाने यावेळी नमूद केले आहे. पुणे जिल्ह्यात विशेषता जिल्ह्यातील घाट माथ्यावर देखील आठ ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार असा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भात देखील आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत राज्यात दहा ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे. निश्चितच हवामान विभागाचा हा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा राहणार आहे. मात्र या कालावधीत पडणारा पाऊस जुलै प्रमाणे अति मुसळधारर राहणार नाही.
उत्तर भारतात जोरदार पाऊस होणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. या हवामान प्रणालीमुळे आणि हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे उत्तर भारतात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
हिमालयापासून ते दिल्लीपर्यंत आगामी काही तास हा प्रभाव कायम राहणार असा अंदाज आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा प्रभाव म्हणून पूर्व व पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस वाढला असल्याचे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे.