Maharashtra Rain : महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने मोठा खंड पडला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतभर मान्सून पसरला. परंतु मान्सून आल्यानंतर मोसमी पाऊस गायब झाला. महाराष्ट्रात तर जून महिन्यात एक जून ते 21 जून या कालावधीमध्ये केवळ 11.5% पावसाची नोंद झाली.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला होता मात्र कोकण आणि घाटमाथा परिसरातच जोरदार पाऊस पडत होता. राज्यातील उर्वरित भागात पावसाची उघडीप होती. दरम्यान जुलै महिन्यात थोडस चित्र बदललं. जुलै महिन्याची सुरुवात राज्यात जोरदार पावसाने झाली.
एक जुलै ते सहा जुलै पर्यंतच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर ओसरत आहे. कोकणसोडून राज्यात कुठेच समाधानकारक पाऊस पडत नाहीये. सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात आले आहेत.
राज्यातील काही भागात खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर काही भागात अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान आता बळीराजाची ही आतुरता वरूणराजा पूर्ण करणार असे चित्र तयार होत आहे.
कारण की, भारतीय हवामान विभागाने 11 जुलैपासून ते 13 जुलै पर्यंत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीमध्ये किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असा देखील अंदाज आहे. साहजिकच यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सावधानता बाळगणे अपेक्षित आहे.
दरम्यान या कालावधीमध्ये राज्यातील कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या संबंधित विभागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
याव्यतिरिक्त, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज यावेळी हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आगामी काही दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता तरी दिलासा मिळतो का? हे पाहण्यासारखे राहणार आहे.