Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अन कोकणात अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागातील शेती पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.
एकंदरीत, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात महाराष्ट्रावर रुसलेला पाऊस आता मान्सूनोत्तर त्राहिमाम माजवत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडणार असा अंदाज आहे.
खरे तर सुरवातीला भारतीय हवामान विभागाने राज्यात 25 नोव्हेंबर पासून ते 28 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली होती.
यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे. मात्र 29 नोव्हेंबर पासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळणार आणि पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होणार असा अंदाज होता.
पण आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाला असून अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम म्हणून आगामी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे.
आणखी किती दिवस राहणार अवकाळीचा मुक्काम
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. विशेष म्हणजे नाशिक, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होईल असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 48 तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आहे.
या भागातील नाशिक, पुणे, अहमदनगरसह बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. या काळात काही भागात गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाची आणि गारपीटीची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.