Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. अर्धा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. हा पावसाचा ब्रेक शेतकऱ्यांची चिंता वाढवत असून आता शेतकरी बांधव मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. कापसाचे पीक जवळपास 50 ते 55 दिवसाचे झाले आहे. सोयाबीन देखील फुलोरा अवस्थेत आले असून या पिकाला आता पावसाची गरज आहे. शिवाय राज्यातील अनेक धरणांमध्ये अजूनही मुबलक पाण्याचा साठा तयार झालेला नाही.
यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. उन्हाळ्यात देखील पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आता मोठा पाऊस पडण्याची गरज आहे जेणेकरून राज्यातील सर्व महत्त्वाची धरणे पूर्ण क्षमतेने भरतील. वास्तविक, गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात पुरेसा पाऊस पडला नव्हता मात्र जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्याची पावसाची तूट भरून निघाली होती.
जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यात झालेल्या अवघ्या काही दिवसाच्या पावसाने भरून काढली यामुळे शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस पडेल आणि शेतीमधून त्यांना अपेक्षित अशी कमाई करता येईल अशी आशा वाटत होती. पण आता जवळपास 17 दिवसांपासून महाराष्ट्रातील कोणत्याच भागात जोरदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी तर जवळपास 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा खंड आहे.
अशा परिस्थिती ज्या भागात पावसाचा खंड वाढला आहे तेथील शेती पिके करपू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे ते पिकांना पाणी देत आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांची पिके आता करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने तब्बल 51 वर्षानंतर मान्सून काळात पावसाचा एवढा मोठा खंड पडला असल्याचे सांगितले आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे यापूर्वी 1972 मध्ये 18 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान मान्सूनचा ब्रेक पाहायला मिळाला होता. 1972 मध्ये उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात दुष्काळ होता.
खरंतर 1972 चा दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रात होता आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी झाले होते. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. त्यावेळी नागरिकांना कमी पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
आता 1972 नंतर प्रथमच महाराष्ट्रात पावसाचा एवढा मोठा खंड पाहायला मिळत आहे. पावसाचा हा ब्रेक मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. अशातच हवामान विभागाने आगामी काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभाग म्हणतय की बंगालच्या उपसागरात पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. हे ढग उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकत चालले आहेत.
ज्याचा परिणाम 3-4 दिवसांनी पाहायला मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे. 18 ऑगस्ट पासून राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज असून 19 आणि 20 ऑगस्ट रोजी विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता आहे. पण मध्य महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.