Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. रात्री आणि पहाटे थंडी पडत आहे तर दुपारी उन्हाचे कडक चटके बसत आहेत. यामुळे राज्यात सध्या मिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे.
तर मान्सून मध्ये कमी पाऊस बरसला असल्याने या पावसाचा रब्बी हंगामाला फायदा मिळेल असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे.
दरम्यान या निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जनतेच्या माध्यमातून थंडीला केव्हा सुरुवात होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदा दिवाळीतही पाऊस राहणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्र थंडीचा जोर केव्हा वाढणार आणि राज्यात दिवाळीतही पाऊस पडू शकतो का याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रसह देशातील काही राज्यांमध्ये आगामी काही दिवस पाऊस बरसत राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दक्षिण भागात हवामान खात्याच्या माध्यमातून पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वास्तविक पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नऊ नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत राहणार असा अंदाज वर्तवला आहे.
या भागात नऊ नोव्हेंबर पर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि काही भागात पावसाची हजेरी लागत आहे.
दरम्यान आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आगामी दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हवामान विभागाने 10 नोव्हेंबर पासून विदर्भात थंडीचा जोर वाढू शकतो असा अंदाज यावेळी वर्तवला आहे. एकंदरीत दिवाळीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.