Monsoon 2024 : भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला यामुळे यंदाचा मान्सून कसा राहणार असा सवाल होता. हवामान खात्याने मात्र यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज दिला असून यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, काही हवामान तज्ञांनी यंदा मान्सून आगमन वेळे आधीच होणार असा अंदाज दिला आहे. हवामान तज्ञांच्या मते सध्या समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. यामुळे समुद्रावरील हवेचा दाब हा वाढत चालला आहे.
समुद्रावरील हवेचा दाब सध्या 850 हेक्टोपास्कल एवढा आहे. जेव्हा हा दाब 1000 हेक्टोपास्कल एवढा होईल तेव्हा मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता मान्सून निर्मितीला लवकरच सुरुवात होणार आणि यंदा देशात वेळेआधीच मान्सूनचे आगमन होऊ शकते.
अशातच साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फॉरम या संस्थेने देखील भारतीय मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. या संस्थेने भारतासहित दक्षिण आशियाई देशांमध्ये मान्सून जोरदार बरसणार असा अंदाज दिला आहे.
भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात चांगल्या पावसाचा अंदाज या संस्थेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या संस्थेची पुण्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीतच हा अंदाज देण्यात आला आहे.
यात दक्षिण आशियाच्या अतिउत्तरेकडील भागात, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असे देखील म्हटले गेले आहे. या दरम्यान आपल्या महाराष्ट्रात मान्सून काळात कसा पाऊस राहणार असा देखील सवाल उपस्थित होत होता.
पण, या संस्थेने आपल्या महाराष्ट्रातील पावसा संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट दिली आहे. या संस्थेने यंदाचा मान्सून कसा राहणार याबाबतचा एक नकाशा प्रकाशित केला आहे.
यात आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पाऊस होणार असे दाखवले गेले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची वार्ता ठरत आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये यंदा पावसाचे प्रमाण सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज या संस्थेने दिला असून यामुळे यावर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.