Mumbai Nashik Jalgaon Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी मुंबई, नाशिक, जळगावसह राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांसाठी खास राहणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असून यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्या हाउसफुल होत आहेत. प्रवाशांचा वाढता ओघ पाहता आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष गाडी चालवणार आहे.
सीएसएमटी ते मऊ यादरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून सीएसएमटी ते मऊ अशा दोन फेऱ्या आणि मऊ ते सीएसएमटी अशा दोन फेऱ्या होणार आहेत.
या गाडीचा मुंबई, दादर, ठाणे, कल्याणसह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक, स्टॉपेज आणि गाडीची संरचना कशी राहणार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
कसं राहणार उन्हाळी विशेष गाडीचे टाईम टेबल
CSMT ते मऊ ही विशेष गाडी दहा एप्रिल ते एक मे या कालावधीत सीएसएमटी येथून दर बुधवारी 22:35 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी अकरा वाजून दहा मिनिटांनी मऊ रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
दुसरीकडे मऊ ते सीएसएमटी ही विशेष गाडी 12 एप्रिल ते 3 मे या कालावधीत मऊ रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी 13:10 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या कालावधीत सीएसएमटी ते मऊ आणि मऊ ते सीएसएमटी अशा प्रत्येकी दोन फेऱ्या नियोजित आहेत. परिणामी या गाडीचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
गाडीची संरचना कशी राहणार
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे उन्हाळी विशेष गाडी म्हणून चालवली जाणारी ही ट्रेन एकूण 22 डब्यांची राहणार आहे. 22 डब्यांच्या या गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.
अतिरिक्त गर्दीत प्रवाशांना या गाडीमुळे दिलासा मिळणार आहे. या गाडीत १८ डबे शयनयान, 2 वातानुकूलित – तृतीय आणि 2 लगेज कम गार्डचे राहतील.
कुठं थांबणार गाडी
या गाडीला दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपुर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आजमगड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिलेली आहे.