Onion Rate Hike : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वधारू लागले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर, यंदा सुरुवातीलाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव अचानक घसरले होते. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा कवडीमोल दर मिळत होता. विशेष म्हणजे ही परिस्थिती जवळपास जून महिन्यापर्यंत अशीच कायम राहीली. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून होते त्यांना लाखों रुपयांचा फटका सहन करावा लागला.
परिस्थिती एवढी बिकट बनली होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान शासनाला द्यावे लागले आहे. मात्र जुलै महिन्यापासून कांद्याच्या बाजार भावात थोडीशी वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगला विक्रमी दर मिळू लागला.
अशातच मात्र शासनाने कांद्याच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला. शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा दबावात आल्यात. आता मात्र पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव हळूहळू वाढू लागले आहेत.
काल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसीमध्ये कांद्याला तब्बल 5 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजारभाव देखील 3 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास नमूद केले जात आहेत. अशातच कांदा उत्पादकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे आगामी काही दिवस कांद्याचे बाजारभाव असेच तेजीत राहण्याची शक्यता आहे. वास्तविक, सध्या उन्हाळी हंगामातील आणि नवीन खरीप हंगामातील लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. परंतु कमी पावसामुळे खरीप हंगामातील लाल कांद्याचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. शिवाय अजून खरीप हंगामातील लाल कांदा पूर्ण क्षमतेने बाजारात येत नाही.
तसेच उन्हाळी हंगामातील कांदा संपत चालला आहे. यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. तसेच सध्या राज्यात नवरात्र उत्सवाचा सण सुरू आहे आणि पुढील महिन्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मागणीच्या तुलनेत मात्र कांद्याचा पुरवठा होत नाहीये. या गोष्टीचा परिणाम असा झाला की, आता कांद्याचे दर तेजीत आले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याला 6 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव देखील मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे यंदा कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना चांगली कमाई होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.