Onion Rate : भारतात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. विजयादशमीपासून दिवाळीच्या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात असते. यंदा देखील दसऱ्यापासूनच दिवाळीच्या सणाची वाट पाहिली जात होती.
अखेरकार दिवाळीचा सण आता साजरा झाला आहे. मोठ्या आनंदात हा सण साजरा करण्यात आला आहे. पण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजासाठी यंदाची दिवाळी निराशाची ठरली आहे.
यामुळे दिवाळीच्या काळातही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फारसे समाधान पाहायला मिळाले नाही. यंदा शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसला आहे. सोबतच सुलतानी दडपशाही देखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे.
खरंतर, यावर्षी सोयाबीन, कापूस तसेच लाल कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. पावसाळ्यात कमी पाऊस बरसला असल्याने, तसेच काही ठिकाणी पाऊसच झाला नसल्याने सोयाबीन अन कापूस उत्पादनात घट आली आहे.
कांद्याच्या बाबतीत देखील तसेच आहे विशेष म्हणजे रब्बी हंगामात कांदा लागवडीत घट होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीन, कापूससारख्या शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात दबावात होते.
पण दिवाळीसाठी आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसा लागणार होता. यामुळे कापसाला आणि सोयाबीनला कमी भाव मिळत असतानाही शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करावी लागली आहे.
म्हणून शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तथापि कांद्याला जुलै महिन्यापासूनच चांगला दर मिळत आहे. मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली असल्याने बाजारभाव तेजीत असले तरीदेखील शेतकऱ्यांना या तेजीचा फारसा फायदा होणार नसून फक्त उत्पादनातील घट भरून निघेल असे मत व्यक्त केले जात आहे.
वास्तविक, गेल्या महिन्यात कांद्याला चांगला हंगामातील विक्रमी दर मिळत होता. कांद्याचे बाजार भाव 6,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक होते. सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होते.
काही बाजारात तर कमाल बाजारभावाने तब्बल आठ हजार रुपयांपर्यंतचा टप्पा गाठला होता. परंतु बाजारात आलेली ही तेजी सरकारला सहन झाली नाही. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य चारशे डॉलर प्रति टन यावरून वाढवून 800 डॉलर प्रति टन एवढे केले.
तसेच किरकोळ बाजारात केंद्राने बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या दराने विकण्याचा निर्णय घेतला. परिणामी बाजारभावात थोडी घसरण झाली आहे. बाजार भाव दबावत नसले तरी देखील गेल्या महिन्याच्या तुलनेत दरात घट झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
केंद्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच, मात्र कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिवाळीनंतर कांदा दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे.
पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, 16 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची 15136 क्विंटल आवक झाली होती आणि कांद्याला किमान 100, कमाल 6000 आणि सरासरी 3500 एवढा भाव मिळाला होता.
तसेच 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात म्हणजेच कालच्या लिलावात या मार्केटमध्ये 17,212 क्विंटल लाल कांदा आवक झाली आणि कांद्याला किमान शंभर, कमाल 6100 आणि सरासरी 3600 रुपये एवढा भाव मिळाला आहे.