Panjab Dakh Maharashtra Rain Alert : सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्य जणू काही आग फेकत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत.
अशातच, मात्र भारतीय हवामान विभागाने देशात पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि काही भागात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. पण, हवामान खात्याने आपल्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे सांगितलं आहे.
दुसरीकडे पंजाबराव डख यांचा देखील एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळीचे सत्र सुरू होणार असे म्हटले आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ विभागातील पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये येत्या काही दिवसात पावसाची शक्यता तयार होत आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. खरेतर गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच त्राहीमाम वाजवला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती.
तसेच या चालू वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली आहे. म्हणजेच नोव्हेंबर 2023 पासूनच्या प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली असेल.
विशेष म्हणजे आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देखील अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या अगदी सुरुवातीलाच अवकाळी पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. सध्या स्थितीला राज्यातील अनेक भागांमध्ये गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
अशा परिस्थितीत, जर अवकाळी पावसाचे आगमन झाले तर रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. तथापि, पंजाब रावांनी महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पाऊस होणार नसल्याचे म्हटले आहे.
राज्यातील काही मोजक्याच भागात अवकाळी पाऊस बरसणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आता आपण पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या भागात अवकाळीचा अंदाज दिला आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा सुरू होणार अवकाळी पाऊस
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. मात्र 16 मार्चपासून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 16, 17, 18 आणि 19 मार्चला पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीत विदर्भ विभागातील वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, कारंजा, अमरावती, अकोट, चांदूरबाजार, बुलढाणा या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे मोठे भाकीत पंजाबरावांनी वर्तवले आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.