Panjab Dakh News : येत्या तीन दिवसात ऑगस्टचा पहिला पंधरवाडा संपणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपत चालला मात्र तरीही या संपूर्ण महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. या चालू महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र आता ही चिंता लवकरच संपणार असे चित्र तयार होत आहे. कारण की राज्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने देखील राज्यात 20 तारखेनंतर पावसाचा जोर वाढू शकतो असे स्पष्ट केले आहे.
यासोबतच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे अजून अडीच महिने पावसाळा बाकी आहे. या अडीच महिन्याच्या काळात राज्यात सर्वत्र समाधानकारक असा पाऊस होणार आहे.
विशेष म्हणजे यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच यंदा दिवाळीपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येत असून नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात कस राहणार हवामान?
ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा हा कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला मात्र ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात आत्तापर्यंत कोणत्याच भागात जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना हे दुष्काळाच संकेत तर नाही ना असा प्रश्न पडला आहे.
पण यावर्षी दुष्काळ पडणार नाही मुबलक पाऊस पडणार असे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे. त्यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आता राज्यात 15 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात 14 ऑगस्ट नंतरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात 16 ते 30 तारखे दरम्यान जोरदार पाऊस पडणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. नांदेड जिल्ह्यात एका शेतकरी मेळाव्या दरम्यान त्यांनी हा महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल तसेच संपूर्ण मराठवाड्यातच या कालावधीत जोरदार पाऊस राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच मराठवाड्यात 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कस राहणार हवामान?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात देखील 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर महिन्यात देखील 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान जोराचा पाऊस पडू शकतो.