Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसाच्या खंडानंतर काल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची हजेरी लागली. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर राज्यातील बहुतांशी भागात जून महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. जून महिन्यात एक ते 21 जून दरम्यान मात्र 11.5 टक्के एवढा पाऊस पडला होता.
25 जून नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली मात्र हा पाऊस कोकण आणि घाटमाथ्यावरच पडत होता. मात्र आता काल पाच जुलै रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. यात विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाला आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. डख यांनी राज्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. जूनपेक्षा जुलै महिन्यात अधिक पाऊस राहणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
तसेच जुलै पेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात अधिक पाऊस राहील असे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्रात आता 8 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार असे भाकीत वर्तवले असून या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच ज्या भागात आठ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही त्या भागात 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान जोरदार पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आठ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून भाग बदलत पाऊस होणार आहे. तसेच 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान देखील राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
वास्तविक जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जुलै महिन्यातही पावसाचा खंड राहणार अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र आता पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय आगामी काही दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कालच्या पावसाने शेतशिवारात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.
कोणत्या भागात पडणार पाऊस?
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आता पाऊस पडणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आधीपासूनच पाऊस सुरू आहे. आता राज्यातील उर्वरित भागात देखील पाऊस होणार असा अंदाज आहे.