Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्यात या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाने ओढ दिली असल्याने महाराष्ट्रात दुष्काळ पडणार की काय? अशा चर्चा आता शेतकऱ्यांच्या बांधावर रंगत आहेत.
यामुळे कृषी आणि कृषीशी निगडित व्यवसायांमध्ये खूपच नरमाई पाहायला मिळत आहे. कृषीशी संबंधित बाजार पूर्णपणे दबावात आहेत. पावसाने ओढ दिली असल्याने आता बाजारात आधीसारखा उल्हास पाहायला मिळत नाहीये. कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या मनात पावसाबाबत अजूनही संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे.
दरम्यान हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या काळजीमध्ये वाढ झाली आहे. परंतु जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यावर्षी दुष्काळ पडणार नसून कमी कालावधीत जास्तीचा पाऊस पडणार आहे. अजून जवळपास अडीच महिने पावसाचे असून या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असून राज्यातील जवळपास सर्व धरणे फुल भरणार आहेत.
सध्या राज्यातील काही धरणे भरली आहेत, तर काही धरणातून विसर्ग सुरू आहे. याव्यतिरिक्त पंजाबरावांनी आगामी काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत देखील माहिती दिली आहे.
केव्हा पडणार जोरदार पाऊस ?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान राज्यात ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. पण राज्यात 15 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर खऱ्या अर्थाने वाढणार आहे. स्वातंत्र्यदिनानंतर मोठ्या पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अर्थातच सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यातही अशीच परिस्थिती राहणार आणि 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान राज्यात खूप मोठा पाऊस होणार असं मत पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केले आहे.
निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक सिद्ध होणार आहे. जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर निश्चितच या वर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणे चांगला समाधानकारक पाऊस राहील आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडण्याची शक्यता आहे.