Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेसहित बळीराजा चिंतेत आहे. खरीप हंगामातील पिके गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने अक्षरशः करपू लागली आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होईल अशी आशा होती.
मात्र तसे काही झाले नाही या ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत एकदाही राज्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील काही भागात तर या ऑगस्ट महिन्यात रिमझिम श्रावण सऱ्या देखील बरसत नाहीयेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आता जर मोठा पाऊस पडला नाही तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
विहिरींनी तळ गाठला आहे. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये अजूनही शंभर टक्के पाण्याचा साठा तयार झालेला नाही. यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. सर्वत्र पावसाअभावी चिंतेचे वातावरण आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.
पंजाब रावांनी 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 30 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस बरसणार आहे. मात्र काही भागात पावसाची उघडीप राहणार आहे तर तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कुठे पडणार पाऊस
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बोरगाव, अंजनगाव सुर्जी, वासिम, रिसोड, पुसद, कळमनुरी, औंढा, जिंतूर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, टेंभुर्णी, हसनाबाद, जाफराबाद, सिल्लोड, माहूर गाव, जळगाव, चाळीसगाव, वैजापूर, धुळे, मालेगाव, अमळनेर, पाचोरा, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर, आष्टी, राहुरी, जालना, संभाजीनगर, मंठा, पाथर्डी, गेवराई, बीड, पाटोदा, करमाळा, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, परंडा, अकलूज, सांगली, म्हसवड, कामठी, लातूर, शिरूर, जळकोट, श्रीगोंदा, उस्मानाबाद, पाथर्डी या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संबंधित भागांमधील 15 ते 30 किलोमीटरच्या परिसरात पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. तसेच पंजाबरावांनी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परभणी, संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बीड, पंढरपूर, लातूर, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र अपेक्षित असा पाऊस पडणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे. एकंदरीत यावर्षी पंजाबरावांचे बहुतांशी अंदाज फोल ठरले आहेत. यामुळे हा तरी अंदाज खरा ठरतो का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.