Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख साहेब यांनी एक तातडीचा मॅसेज दिला आहे. पंजाबरावांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
खरंतर राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. तापमानात चढ-उतार होत आहे. काही भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे तर काही भागात अजूनही थंडी पडलेली नाही.
यामुळे सर्वसामान्य जनता कडाक्याच्या थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल उपस्थित करत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज राज्यात सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस हजेरी
लावणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रात 24 तारखेला ढगाळ हवामान तयार होईल आणि 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या भागात 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
पण या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वदूर पडणार नाही. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, अवकाळी पाऊस कधीच सर्व दूर पडत नाही म्हणजेच एका जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडेल तर काही भागात हवामान कोरडे राहू शकते.
दरम्यान या कालावधीत पडणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे.यामुळे वीज पडण्याची घटना घडू शकते.
परिणामी शेतकऱ्यांनी सावध आणि सतर्क रहाणे अपेक्षित आहे. पशुधनाची काळजी घेणे देखील जरुरीचे आहे. शेतमाल आणि आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे असा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे.