Pune Metro News : पुणे शहरातील रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महा मेट्रोने पुणे शहरातील विस्तारित मेट्रो मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला आहे.
यानंतर आता पुणे मेट्रोचे जाळे आणखी विस्तारले जाणार असून शहरात चार नवीन मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग हे नवीन मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे या चार मेट्रो मार्गांना पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे. या मार्गांना पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील मंजूरी मिळाली आहे. हे चार मेट्रो मार्ग एकूण 44.8 किलोमीटर लांबीची असून आता या मेट्रो मार्गांचे प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून महा मेट्रोकडे सादर करण्यात आले आहेत.
आता महा मेट्रो या प्रस्तावाला राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मान्यता मिळवून घेणार आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुणे शहरातील रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश महामेट्रोला दिले होते. या आदेशाचे पालन करत महा मेट्रोने या चार मेट्रो मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार केला.
2022 मध्ये हा डीपीआर महापालिकेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला. महापालिकेने या डीपीआर मध्ये थोडासा बदल करत या प्रस्तावाला 4 ऑगस्ट रोजी स्थायी समितीच्या माध्यमातून मंजुरी दिली. यानंतर 14 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या मुख्य सभेत देखील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दरम्यान आता काल हा प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून महा मेट्रोकडे सादर करण्यात आला आहे. आता महामेट्रो राज्य शासन आणि केंद्र शासनाची मान्यता घेणार आहेत. या प्रस्तावाला केंद्र आणि राज्याची मान्यता मिळाल्यानंतर मग या मेट्रो मार्गांचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
या मेट्रो मार्गांसाठी कर्ज घेऊन निधीची उभारणी केली जाणार आहे. महापालिकेला केवळ भूसंपादनासाठी खर्च करावा लागणार आहे. या मार्गांसाठी बारा हजार 683 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
एकंदरीत काल अर्थातच 22 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील या विस्तारित मेट्रो मार्गांचा प्रस्ताव महा मेट्रोकडे सादर झाला असून आता या प्रस्तावाला महा मेट्रो कडून राज्य आणि केंद्र शासनाकडून मान्यता मिळवून घेतली जाणार आहे. यानंतर मग यासाठी पुढील कारवाई सुरू होणार आहे.