Pune-Nashik Semi High Speed Railway : पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत. खरंतर पुणे आणि नाशिक दरम्यान रोजाना हजारो नागरिक प्रवास करतात.
मात्र अद्याप या दोन शहरांना रेल्वे मार्गाने कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही. म्हणजेच या दोन शहरा दरम्यान रेल्वे मार्ग नाही. अशा परिस्थितीत या दोन शहरांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगर मधून जाणार आहे.
यामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. खरंतर हा प्रकल्प या तिन्ही शहरांसाठी अतिमहत्त्वाचा असला तरी देखील या प्रकल्पाचे काम केंद्राच्या मान्यतेअभावी रखडले आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकार मध्ये नव्याने सामील झालेले अजित पवार या प्रकल्पासाठी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच या प्रकल्पात जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत या प्रकल्प बाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली तसेच या प्रकल्पासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार असे देखील उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यावेळी नमूद केले आहे.
अशातच, अजित पवार यांनी आता या प्रकल्पाबाबत काल अर्थातच बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी काही महत्त्वाचे निर्देश देखील दिले आहेत. हा प्रकल्प महारेलकडून राबवला जाणार आहे. यामुळे पवार यांनी महारेलला या प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी महारेलने जर हा प्रकल्प हाती घेतला तर भूसंपादनाचीदेखील अडचण येणार नाही असे नमूद केले आहे. तसेच मेट्रो प्रकल्पासाठी ज्या पद्धतीने भूसंपादन केले जाते त्यानुसारच या प्रकल्पासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
यामुळे या प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार नाही तर केंद्रीय नगर विकास विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. असे केल्यास हा प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतो असे देखील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामुळे या बैठकीत अजित पवार यांनी मेट्रो कायद्यानुसार कायद्यानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परिवहन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
एकंदरीत या निर्णयामुळे आता हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यातील 54 गावांमध्ये जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
कसा आहे रेल्वे मार्ग?
हा रेल्वे मार्ग 235 किलोमीटर लांबीचा राहणार असून नासिक, अहमदनगर आणि पुणे या तीन शहरांना जोडणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे ते नाशिक हा प्रवास मात्र पाऊणेदोन तासात पूर्ण करता येणार आहे.
या प्रकल्पासाठी 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी लागणार असून केंद्र सरकार 20%, राज्य सरकार 20% आणि उर्वरित 60% निधी कर्ज स्वरूपात उभारला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 18 बोगदे, 70 पूल, 46 उड्डाणपूल, 96 भुयारी मार्ग विकसित केले जाणार आहेत. या रेल्वेमार्गात एकूण 20 स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील या गावात होणार भूसंपादन
नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर अशा दोन तालुक्यातील 23 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव आणि सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिंपी, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडीमजरे, मुसळगाव,गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूर शिंगोटे, चास नळवंडी या 23 गावात या मार्गासाठी जमिनीचे संपादन केले जाणार आहे. या 23 गावातील जवळपास सव्वा दोनशे हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे.
अहमदनगर मधील या गावात होणार जमिनीचे संपादन
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अंभोरे, पोखरी हवेली, कोळवाडे, येळखोपवाडी, अकलापूर, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, साकुर, माळवाडी, बोटा, रणखांबवाडी, पीपरणे, जाखुरी आणि खंडेरायवाडी, समनापुर, कोल्हेवाडी, जोर्वे, पळासखेडे, निमोन, सोनेवाडी, पिंपळे, पारेगाव खुर्द, खराडी, नान्नज दुमाला आणि केळेवाडी या 26 गावात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या गावातही जमिनीचे संपादन होणार आहे.