Pune Weather Update : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या पावसाळ्याच्या दीड महिन्याच्या काळात काही दिवस वगळता पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला होता. मात्र उर्वरित राज्यात पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली होती तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जुलै महिन्याचा पहिला आठवडा जोरदार पावसाचा राहिला.
या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील बहुतांशी भागात पेरणीची कामे पूर्ण झालीत. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणेकरांसाठी देखील एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरात आणि जिल्ह्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने पावसाबाबतचा नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या हवामान अंदाजानुसार, पुणे शहरात आज म्हणजे रविवारपासून ते गुरुवारपर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तसेच 18 व 19 तारखेला शहरात पावसाचा जोर जास्त राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभाग पुणेचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत शहरात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज शहरात हलका पाऊस पडेल तर उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
उद्यापासून 22 जुलै पर्यंत चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. निश्चितच, पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी राहणार आहे. वास्तविक, जून महिन्यात आणि जुलै महिन्यातही पुण्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.
यामुळे पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला असूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदवार्ता राहणार आहे.