Rabi Onion Variety : महाराष्ट्रात कांदा या पिकाची खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तिन्ही हंगामात लागवड केली जाते. मात्र खरीप आणि लेट खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बीमध्ये कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रब्बी हंगामातील राज्यातील हवामान कांदा पिकासाठी विशेष मानवते. रब्बीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
शिवाय, रब्बी हंगामात उत्पादित झालेला कांदा हा जवळपास सहा ते सात महिने साठवला जाऊ शकतो. हेच कारण आहे की रब्बी मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी देखील रब्बी हंगामात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाणार आहे. यंदा पाऊसमान कमी असल्याने कदाचित रब्बी हंगामातील कांदा लागवडीखालील क्षेत्र थोडे घटू शकते.
मात्र तरीही ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस झाला आहे आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे अशा भागात रब्बी हंगामात कांदा लागवड चांगल्या प्रमाणात पाहायला मिळू शकते. अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामासाठी कांद्याचे सर्वोत्कृष्ट वाण कोणते आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रब्बी साठी कांद्याच्या सर्वोत्कृष्ट जाती खालील प्रमाणे
पंचगंगा सीड्सचे पूना फुरसुंगी : पंचगंगा सीड्सचे पुन्हा फुरसुंगी हे एक कांद्याचे प्रमुख वाण आहे. या वाणाच्या कांद्याची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीच्या कांद्याचा रंग आकर्षक चमकदार लाल असतो. या जातीच्या कांद्याची टिकवण क्षमता खूपच अधिक असते. हा वाण 120 दिवसात परिपक्व होतो.
एन-2-4-1 : हा देखील रब्बी हंगामात उत्पादित होणारा कांद्याचा एक प्रमुख वाण आहे. या जातीपासून हेक्टरी साडेतीनशे ते साडेचारशे क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. या जातीचा कांदा मध्यम आकाराचा आणि चपटी गोल असतो. या कांद्याला गरवा, भगवा आणि गावरान कांदा म्हणूनही ओळखले जाते. या जातीचा कांदा सरासरी सहा ते आठ महिने एवढ्या काळासाठी टिकू शकतो.
भीमा शक्ती : कांद्याचा हा वाण रब्बी हंगामात आणि महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीच्या कांद्याचा रंग लाल असतो. सरासरी 130 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या जातीपासून 28 ते 30 टन प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीचा कांदा जवळपास पाच ते सहा महिने टिकतो.
भीमा किरण : या जातीची रब्बी हंगामात शेती केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील हवामान या वाणासं मानवते. सरासरी 135 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते आणि 28 ते 32 टन पर्यंतचे उत्पादन या वाणापासून उत्पादन मिळू शकते. या जातीचा कांदा पाच ते सहा महिने टिकतो.