Rabi Season : राज्यात गव्हाची आणि हरभऱ्याची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे दोन्ही पीक रब्बी हंगामातील प्रमुख पीके आहेत. अलीकडे मात्र या दोन्ही पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पिकासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढलेले दर, शेतमजुरीचे वाढलेले दर या सर्व पार्श्वभूमीवर आता गहू आणि हरभरा हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे.
या पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. विशेष म्हणजे अधिकचा उत्पादन खर्च करूनही गहू आणि हरभरा पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय बाजारात गव्हाला आणि हरभऱ्याला पाहिजे तसा भाव सापडत नाही.
यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. परिणामी आता राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव या पिकांना पर्यायी पिकाची शोधाशोध करू लागले आहेत. आता राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी या दोन्ही पिकांना पर्यायी पीक म्हणून चिया या औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.
वाशिम जिल्ह्यात या पिकाची मोठी लागवड झाली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चिया पिकाला इतर कोणत्याही पिकांप्रमाणे रासायनिक फवारणीची फारशी गरज भासत नाही. या पिकावर खूपच कमी प्रमाणात रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
रासायनिक फवारणी करावी लागत नाही परिणामी उत्पादनात देखील घट येत नाही. विशेष बाब म्हणजे वन्य प्राणी या पिकाला खात नाहीत. यामुळे या पिकासाठी खूपच कमी उत्पादन खर्च करावा लागतो. या पिकाची शेती केल्यास मजुरीवर होणारा खर्च देखील बऱ्यापैकी वाचतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिया ही एक औषधी वनस्पती असल्याने याच्या बियांना बाजारात मोठी मागणी असते. बाजारात बारामाही मागणी असते शिवाय याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी पिकाच्या शेतीकडे वळले आहेत.
चिया पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी चिया शेतीतून चांगले उत्पादन मिळते आणि दरही चांगला मिळतो असे सांगितले आहे. विशेष म्हणजे या पिकाला फक्त पाण्याची गरज असते फवारणी आणि खतांची आवश्यकता भासत नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
किती उत्पादन मिळते?
चिया रब्बी हंगामात उत्पादित केले जाणारे एक प्रमुख औषधी पीक आहे. हे पीक लागवडीनंतर सरासरी 110 ते 115 दिवसात परिपक्व होत असते. पीक परिपक्व झाल्यानंतर याची झाडे उपटली जातात आणि पाच ते सहा दिवस उन्हात वाळवली जातात. यानंतर मग थ्रेशर मशीनच्या सहाय्याने बिया काढल्या जातात.
या पिकापासूनच सरासरी एकरी पाच ते सहा क्विंटल एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. एकूणच काय की कमी उत्पादन खर्च, अधिकचे उत्पादन आणि पिकाला मिळणारा अधिकचा भाव या सर्व पार्श्वभूमीवर चिया लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.